Select Page

आमच्याबद्दल

ध्येय, उद्दिष्टे आणि ब्रीद

संस्थेचा, देशाचा आणि उच्चतम मूल्यांचा गौरवशाली वारसा जपत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, त्यांच्यामध्ये उत्तम नैतिक मूल्ये आणि जबाबदारीची जाणीव रुजवणे.

संस्थेच्या कार्याचा आत्मा खालील शब्दांत सामावलेला आहे:

संस्थेचे ब्रीदवाक्य

तेजस्विनावधीतमस्तु

(आम्ही मिळवलेले शिक्षण तेजस्वी होवो.)

शेठ म. ग. हायस्कूल, देवगड ब्रीदवाक्य

ज्ञानं शीलमं तपोबलम्

(ज्ञान, चारित्र्य आणि तप हेच आमचे सामर्थ्य).

अ. कृ. केळकर हायस्कूल, वाडा ब्रीदवाक्य

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते

(ह्या जगात, ज्ञानाइतके पवित्र काहीही नाही ).

आमची उद्दिष्टे

Z

सर्वांगीण विकास

केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे, तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि व्यावहारिक विकास साधणे.

Z

ग्रामीण उत्थान

कोकणातील दुर्गम भागातील मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे.

Z

मूल्यांची जोपासना

“ज्ञानं शीलमं तपोबलम्” या सूत्रानुसार सुसंस्कृत पिढी घडवणे.

प्रेरणादायी इतिहास

स्वातंत्र्यपूर्व काळातील १८८० चा काळ.

  • सुविधांचा अभाव असलेल्या देवगडमध्ये काही शिक्षणप्रेमींनी ‘इथे शिक्षण सुरू व्हावं’ हा ध्यास घेतला.
  • १८८० पासून सुरू झालेल्या खाजगी वर्गांचे रूपांतर ३ मार्च १९१९ रोजी ‘श्रीराम इंग्लिश स्कूल’मध्ये झाले.
  • ही देवगड तालुक्यातील माध्यमिक शिक्षणाची खऱ्या अर्थाने सुरुवात होती.
  • ९ डिसेंबर १९३३ रोजी मुंबईत स्थायिक झालेल्या देवगडच्या सुपुत्रांनी एकत्र येऊन ‘देवगड एज्युकेशन बोर्ड‘ स्थापन केले’.
  • साहित्यसम्राट न. चि. केळकर हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष लाभले.
  • त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रावबहादूर आचरेकर यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ मंडळींच्या प्रयत्नांनी संस्थेची घोडदौड सुरू झाली.

आमचे आधारस्तंभ

संस्थेच्या जडणघडणीत ज्या थोर व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता:
दातृत्वाचे प्रतीक: श्रीमंत शेठ मफतलाल गगलभाई १९३८ मध्ये त्यांनी दिलेल्या १३,५०० रुपयांच्या (त्या काळातील मोठी रक्कम) देणगीमुळे शाळेला ‘शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल’ हे नाव मिळाले. त्यांच्या दातृत्वामुळेच शाळेच्या भव्य इमारतीचा पाया रचला गेला.

शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते:

जगन्नाथ अनंत केळकर

वाडा (ता. देवगड) परिसरातील माध्यमिक शिक्षणाची निकड ओळखून श्री. जगन्नाथ अनंत केळकर यांनी दिलेल्या उदार देणगीतून ‘अनंत कृष्ण केळकर हायस्कूल’ची उभारणी झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून ज्ञानप्रसाराच्या कार्याला बळ देण्यात त्यांच्या योगदानाचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

सुवर्णयुगाचे शिल्पकार (Visionary Leaders)

शाळेला केवळ भक्कम इमारत नव्हे, तर मूल्यांचा आत्मा, संस्कारांची दिशा आणि गुणवत्तेची ओळख देणारे हे शिक्षणमहर्षी …

Z

डॉ. शंकर अनंत टेंकशे

१९४२ ते १९७० या २८ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी शाळेला सुवर्णयुग प्राप्त करून दिले. त्यांच्या विद्वत्तापूर्ण नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, संस्कार आणि लौकिक यांची उल्लेखनीय उंची गाठली. शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाचा गौरव म्हणून १९६५ साली त्यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Z

का. रा. नाबर सर:

गणित विषयावरील विलक्षण प्रभुत्व, शिस्तप्रियता आणि दूरदृष्टीपूर्ण प्रशासन यांमुळे त्यांनी शाळेच्या प्रगतीला नवे परिमाण दिले. १९७० च्या दशकात त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेची गुणवत्ता, शिस्त आणि शैक्षणिक परंपरा अधिक बळकट व समृद्ध झाली.

महत्त्वाचे टप्पे

1880
}
देवगडमध्ये इंग्रजी शिक्षणाच्या खाजगी वर्गांचा प्रारंभ.
1919
}
श्रीराम इंग्लिश स्कूलची स्थापना (३ मार्च १९१९).
1933
}
'देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई' ची स्थापना (९ डिसेंबर १९३३).
1938
}
शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल असे नामकरण.
1955
}
वाडा येथे माध्यमिक शाळेचा प्रारंभ आणि संस्थेत विलीनीकरण.
१९५८
}
वाडा या माध्यमिक शाळेचे नाव बदलून अनंत कृष्ण केळकर हायस्कूल केले.
1965
}
डॉ. टेंकशे सरांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
१९९३
}
देवगड एज्युकेशन बोर्ड रौप्य महोत्सव
2000
}
बालवाडी व प्राथमिक विभागाची यशस्वी सुरुवात.
2005
}
अ. कृ. केळकर हायस्कूल, वाडा या शाळेचा दिमाखदार ‘सुवर्ण महोत्सव'.
2005
}
काळाची गरज ओळखून 'सेमी-इंग्रजी' माध्यमाचा प्रारंभ.
2013
}
उच्च माध्यमिक (वाणिज्य शाखा) सुरू झाली.
2019
}
शेठ म. ग. हायस्कूलचा दिमाखदार 'शताब्दी महोत्सव'.
२०२४
}
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळेचा रौप्य महोत्सव
२०२५
}
'मातोश्री सुंदरा शंकर वळंजू' विद्याभवन शाळेच्या इमारतीचे उद्घाटन

आजची संस्था : परंपरा, गुणवत्ता आणि आधुनिकतेचा संगम

आज देवगड एज्युकेशन बोर्डाच्या छत्राखाली पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर मराठी व सेमी-इंग्रजी माध्यमातून अद्ययावत सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे.
डिजिटल शिक्षणपद्धती, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि वाणिज्य शाखेच्या विस्तारामुळे संस्थेने काळानुरूप स्वतःला सक्षमपणे विकसित केले आहे. ज्ञान, संस्कार आणि सर्वांगीण विकास यांचा सुंदर संगम साधत ही संस्था आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून मानाने ओळखली जाते.
एसएससी बोर्डाच्या गुणवत्ता यादीतील उल्लेखनीय यश, विविध क्रीडा स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीतून संस्थेची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आजअधिक तेजाने झळकत आहे.

भविष्याकडे वाटचाल

“ज्ञानं शीलमं तपोबलम्” हे शाळेचे ब्रीद सार्थ ठरवत आम्ही भविष्यातील आव्हानांना पेलण्यासाठी सज्ज आहोत. तंत्रज्ञान आणि नैतिक मूल्ये यांची सांगड घालून, कोकणच्या मातीतील हिऱ्यांना पैलू पाडण्याचे आमचे ध्येय आजही कायम आहे. येणाऱ्या काळात जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्या दारात आणण्यासाठी ‘देवगड एज्युकेशन बोर्ड’ कटिबद्ध आहे.
संस्थेच्या प्रगतीचा हा आलेख आमच्या आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक आणि देणगीदारांच्या त्यागाचा आणि समर्पणाचा जिवंत पुरावा आहे.